रत्नागिरी : जिल्हा पोलीस दलाच्या श्वान पथकात एका बेल्जियन मालिनॉइस जातीच्या श्वानाचा अधिकृतपणे समावेश करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे आयोजित एका कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या उपस्थितीत या श्वानाचे नामकरण करण्यात आले. या नव्या श्वानाला “लिओ” असे नाव देण्यात आले आहे.

बेल्जियन मालिनॉइस ही जात तिच्या कार्यक्षमता, तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि धाडसासाठी सुरक्षा दलांमध्ये ओळखली जाते.

रत्नागिरी पोलीस श्वान पथकात या जातीचा श्वान पहिल्यांदाच दाखल झाला असून, यामुळे गुन्हे अन्वेषण आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामात पोलीस दलाची ताकद वाढणार आहे.

हा नवीन श्वान आगामी काळात पोलीस प्रशासनाला गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी आणि विविध मोहिमांमध्ये मदत करेल, असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला पोलीस दलातील अधिकारी आणि श्वान पथकाचे कर्मचारी उपस्थित होते.