दापोली : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १ जुलै रोजी साजरा होणाऱ्या कृषी दिनाचे औचित्य साधून दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यापीठाच्या दापोली येथील मुख्यालयात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन विस्तार शिक्षण संचालक अतुल मोहोड, संशोधन संचालक प्रशांत शहारे, कुलसचिव उमेश चांदिवडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यानंतर वनशास्त्र महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर दुर्मिळ होत चाललेल्या आणि निसर्गाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विविध वृक्षांची लागवड करून या कार्यक्रमाची अधिकृत सुरुवात करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे यांनी वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण करून आपला सहभाग नोंदवला.

विद्यापीठाच्या मुख्यालय परिसरासह कार्यक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमधील घटक महाविद्यालये, कृषी पदविका विद्यालये, सर्व संशोधन केंद्रे आणि कृषी विज्ञान केंद्रांमध्येही या निमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर फळझाडे आणि वनवृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही या मोहिमेत हिरीरिने सहभाग घेत वृक्षारोपण केले.

ही वृक्षारोपण मोहीम १ ते ७ जुलै या कालावधीत व्यापक प्रमाणात राबवून ‘कृषी सप्ताह’ साजरा करण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या संपूर्ण कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक तसेच अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.