रत्नागिरी जिल्ह्यात प्रलंबित असणाऱ्या सर्व क्रीडासंकुल व इतर क्रीडा सुविधांची कामे लवकर पूर्ण करा, असे निर्देश राज्याच्या क्रीडा व उद्योग आणि पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी येथे बैठकीत दिले.
जिल्ह्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या असताना त्यांनी येथील शासकीय विश्रामगृह सभाग्रहात क्रीडा तसेच पर्यटन विभागाच्या कामांची माहिती जाणून घेतली.
या बैठकीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदूराणी जाखड, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर तसेच एमटीडीसीचे प्रशांत पडळकर आदींची मुख्य उपस्थिती होती.
अनेक ठिकाणी सुरू झालेली कामे कंत्राटदारांनी अर्धवट सोडली आहेत. यामुळे तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुलाची कामे लांबणीवर पडली आहेत. या सर्वांचा सविस्तर प्रस्ताव मुंबईला सादर करा व नव्याने कामांना सुरुवात करून ही कामे पूर्ण करा असे निर्देश त्यांनी या वेळी दिले.
फुटबॉल किंवा हॉलीबॉल सारखी मैदाने तयार होतात परंतु याला फारसा प्रतिसाद नसतो त्यामुळे त्या जागी कबड्डी खो-खो मल्लखांब आआदि स्थानिक खेळांसाठी ची मैदाने विकसित करा असेही क्रीडा राज्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.
पर्यटन स्थळे विकसित करताना राज्य पुरातत्त्व खात्याच्या नियंत्रणात असणाऱ्या गडकिल्ल्यांना निधी देऊन पर्यटन क्षेत्र विकसित करण्याचा आराखडा सादर करा असे निर्देश त्यांनी यावेळी पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
क वर्गातील पर्यटन स्थळे दर्जा बदलून ब वर्ग पर्यटन स्थळा बाबत प्रस्ताव देखील जिल्हा परिषदेने सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले