मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कार्याची व्यापक प्रसिद्धी आणि रस्ता सुरक्षा अभियानाच्या जनजागृतीसाठी प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख यांची ‘सदिच्छा राजदूत’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईतील मंत्रालय येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रितेश देशमुख यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

राज्यातील सामान्य जनतेची वाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या सेवांचा विस्तार आणि प्रवाशांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ही महत्त्वाची निवड करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर प्रताप सरनाईक, दादा भुसे, छगन भुजबळ, शिवेंद्रराजे भोसले, यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य आणि प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एसटीच्या प्रवासाला अधिक ग्लॅमर मिळवून देणे आणि रस्ता सुरक्षा मोहिमेला प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा या नियुक्तीमागचा मुख्य उद्देश आहे.

या नवीन जबाबदारीमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या मोहिमेला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.