मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या २०२६ च्या दहावीच्या (SSC) परीक्षेत ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड (पूर्व) येथील सेंट अँड्र्यूज कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आफिया नूरुद्दीन दळवी हिने ९०.४० टक्के गुण मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
आफियाने एकूण ५०० पैकी ४५२ गुण मिळवले असून तिने सर्वच विषयांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तिला इंग्रजीत ९३, मराठीत ८६, हिंदीत ८२, गणितात ९४, विज्ञान आणि तंत्रज्ञानात ९४, तर समाजशास्त्रात ८५ गुण मिळाले आहेत.
तिच्या या उत्तम कामगिरीबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि परिसरातून तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला सत्कार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत एसएससी (दहावी) बोर्डाच्या परीक्षेत प्रावीण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. या सोहळ्यात दहावीच्या परीक्षेत ९०.४० टक्के इतके घवघवीत यश संपादन करणाऱ्या आफिया नूरुद्दीन दळवी या विद्यार्थिनीचा विशेष सन्मान करण्यात आला. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत तिला गौरविण्यात आले असून, या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे आणि तिच्या कुटुंबाचे विशेष कौतुक केले जात आहे.


