Dapoli : शहरातील दापोली शिक्षण संस्था संचालित ए. जी. हायस्कूलच्या १४ वर्षे वयोगटाखालील मुलींच्या कबड्डी संघाने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या शानदार विजयासह या संघाची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या उज्वल यशामध्ये विद्यार्थिनींना क्रीडा शिक्षक योगेश खोत, अमित वाखंडे, प्रदीप शिगवण आणि प्रथमेश दाभोळे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले असून अंतिम सामन्यासाठी भूषण कुलकर्णी यांचेही विशेष मार्गदर्शन संघाला मिळाले.

या उल्लेखनीय यशाबद्दल दापोली एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रसाद करमरकर, संस्थेचे सेक्रेटरी विनोद जोशी, शालेय समिती चेअरमन रविंद्र कालेकर यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक शरद कांबळे, उपमुख्याध्यापक एस. आय. मगदूम, पर्यवेक्षक अनिल पेटकर, सोनाली मेहंदळे तसेच सर्व शिक्षकवृंद आणि पालकांनी विजयी विद्यार्थिनींचे विशेष कौतुक करत त्यांना पुढील कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.