३० तरूण एकत्र आले आणि गव्हे गावात सहकाराचा पाया रूजवला
दापोली (अजित सुर्वे) : कोणत्याही संकटांच्या प्रसंगांत खंबीरपणे पाय रोवून उभे राहणे हा कोकणी माणसांचा मूळ स्वभाव आहे. या स्वभावातूनच, मागील चार महिन्यांच्या कठीण अशा टाळेबंदीच्या काळात जगण्याचे नवनवे पर्याय कोकणात शोधले जात आहेत. टाळेबंदीमुळे सुमारे 90% चाकरमानी सध्या कोकणात स्थिरावला आहे. मुंबई सारख्या महानगरांच्या वेगाला सरावलेली त्यांची शरीरं आता गावात देखील स्वस्थ बसायला तयार नाहीत. श्रमांना प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या या कष्टकरी चाकरमान्यांनी गावांतील राबणाऱ्या हातांना आता विश्वासाची साथ देत आपल्या उपजीविकेचे नवे पर्याय स्वीकारायला सुरुवात केली आहे.
तालुक्यातील गव्हे तळेवाडी येथील युवकांनी हाती घेतलेला हा उपक्रम याचेच एक उत्तम उदाहरण बनले आहे. मारुतीच्या शेपटी सारखा लांबत लांबत जाणाऱ्या या लॉकडावूनच्या काळावर गव्हे तळेवाडीतील या युवकांनी मात केली आहे. तीस युवकांनी एकत्र येऊन गावातील सुमारे त्रेपन्न गुंठे पडीक जमिनीवर सहकाराच्या माध्यमातून समूह शेतीचा उपक्रम हाती घेतला आहे.
वाडीतील श्री भैरिनाथ विकास मंडळाचे स्थानिक अध्यक्ष लक्ष्मण गुरव यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक आणि चाकरमानी असलेल्या तीस युवकांनी एकत्र येऊन या उपक्रमाची रुपरेषा ठरवून ती प्रत्यक्ष कृतीत उतरवली आहे. यावेळी लक्ष्मण गुरव यांनी अधिक माहिती देताना सांगितले की,
सध्या भात शेतीने सुरुवात झालेल्या या उपक्रमाला भविष्यात सहकारावर आधारित कृषिपुरक व्यवसायाचे मोठे स्वरूप प्राप्त करून देण्याचा आमचा मानस आहे. यात सहभागी असलेल्या युवकांची वैयक्तिक शेतीची कामे आटोपल्यानंतर आम्ही या उपक्रमाला सुरुवात केली आहे. भात शेतीचाच हंगाम असल्याने आम्ही सर्वांनी पारंपारिक भात शेतीपासून याची सुरुवात करण्याचे ठरवले, गावातील दानशूर जमीन मालक आप्पा लिंगावळे यांचे यासाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे.
तालुका कृषी विभागाशी संपर्क करून त्यांच्या मार्गदर्शनाने ज्या लाल तांदळाला जास्त मागणी असते त्या रत्नागिरी- 7 आणि 8 या जातीच्या वाणाची आम्ही निवड केली. मंडळ कृषी अधिकारी(दाभोळ) जयकुमार मेटे, कृषी सहाय्यक दर्शना वरवडेकर, मोहन दुबळे, हरिश्चंद्र मोगरे, एस. पी. काष्टे आणि कृषिसेवक शुभंकर यादव या सर्वांनी या कामी मोलाचे सहाय्य केले आहे असे गुरव यांनी सांगितले. यात सहभागी असलेल्या संतोष आंग्रे, सुनिल गुरव, उपेंद्र चव्हाण, सुभाष चव्हाण, विजय गुरव, मंगेश मोरे, विलास मोरे, स्वप्नील मोरे, सचिन गुरव, शुभांगी मुंडेकर, कुसुम रहाटे, चंद्रप्रभा रहाटे, ओंकार गुरव, प्रमोद पवार, यतीन पवार, महेंद्र शिर्के, संतोष चव्हाण, विनेश कोबनाक, ग्राम पंचायत सदस्य शेतकरी मित्र सुधाकर मोरे व संध्या गुरव आदींनी आपला क्रियाशील सहभाग नोंदवला आहे.
सहकारातून समूह शेतीकडे वळणाऱ्या या युवकांचे उप विभागीय कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी विशेष अभिनंदन केले आहे. समूह शेतीच्या त्यांच्या पुढील सर्व उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन देऊन तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी समूह आणि सहकाराचा मार्ग निवडून या कठीण काळातील आपल्या बेरोजगारीवर मात करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
गव्हे तळेवाडी येथील युवकांनी घालून दिलेला हा आदर्श कोकणातील उपक्रमशील युवकांमध्ये नवा आशावाद निर्माण करणारा ठरेल. असा विश्वास तालुक्यातील जाणकार व अभ्यासू लोकांमधून व्यक्त होत आहे.