दापोली : तालुक्यातील हर्णैमध्ये चक्रीवादळाच्या पंचनाम्यामध्ये झालेला घोळ आणि ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत तहसीलदार वैशाली पाटील यांनी हर्णै कोतवाल राखी वेदपाठक हिच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
हर्णैमध्ये चक्रवादळाचा मोठा फटका बसला होता. पंचनामे घरात बसून झाल्याचे आरोप होते. शिवाय काही मोजक्या आणि ठराविक लोकांनाच सरकारी मदत मिळाली होती. याला घोळाप्रकरणी ग्रामस्थांनी कोतवाल राखी वेदपाठक यांनी जबाबदार धरलं होतं. त्याचबरोबर ग्रामस्थांशी व्यवस्थित न वागणं त्यांना अपमानास्पद वागणूक देण्याच्या तक्रारी सुद्धा वाढल्या होत्या.
पाळंदे येथील अनिल आरेकर यांनीही कोतवलाविरोधात तहसीलदार, प्रांत आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्याचबरोबर हर्णैमध्ये तहसीलदार समीर घारे यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये कोतवालाविरोधात तक्रारी प्रचंड आल्या होत्या. ग्रामस्थांनी त्या बैठकीत तिच्या विरोधात कारवाई व्हावी यासाठी काही काळ गोंधळही घातला होता. त्यावेळी चौकशी करून योग्य ती करावाई करण्याचं आश्वासन तहसीलदार समीर घारे यांनी ग्रामस्थांना दिल्यानंतर ते शांत झाले होते.
अखेर चौकशी करून संबंधीत कोतवाल राखी वेदपाठक हिला आज निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामस्थांनी या प्रकरणी दिलेला लढा यशस्वी झाल्याचं बोललं जात आहे!