दापोली – आमदार भास्कर जाधव ज्येष्ठ आहेत, त्यांनी सल्ला देत रहावा, असा उपरोधिक टोला रायगडचे खा. सीनील तटकरे यांनी लगावला. पक्षबदल अनेकजण करत असतात, हा बदल आमिषापोटी झाला असा आरोप जर पक्षबदल करणाऱ्यांनीच केला तर दुर्दैवी आहे, अशी टीकाही त्यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर केली आहे. खासदार तटकरे संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी दापोलीत आले होते.
कुणबी समाजातील काही नेत्यांनी अलिकडेच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावर आमदार भास्कर जाधव यांनी, विधानपरिषद उमेदवारी देतो असा शब्द राष्ट्रवादीकडून देण्यात आला आहे आणि याच अमिषापोटी काहींनी पक्षबदल केला, असा आरोप केला होता.
विधानपरिषद उमेदवारी सुनील तटकरे यांनी दयावी. आपण राष्ट्रवादीत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील विधानपरिषद जागा माझ्याकडे होती. ती रायगडला गेली व तटकरे यांनी मुलाला आमदार केले, असाही थेट आरोप गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केला होता.
२०२४ होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत कुणबी समाजाला विधानपरिषदेची रत्नागिरी जिल्ह्याची उमेदवारी परत दया, आम्ही काय लागेल ती मदत करु, असं आमदार भास्कर जाधव यांनी तटकरे यांना सांगितले.
जाधव यांच्या आरोपांना सुनिल तटकरे यांनी उत्तर दिले आहे.
आमिष दाखवून कोण पक्षप्रवेश करत हे कोणी बोलाव?, ज्यांनी पक्षबदल केलेत त्यांनी? असं सांगत तटकरे यांनी जाधव यांच्या विधानाची खिल्ली उडवली आहे.
विधानपरिषद जागा कोकणाची असते. यापूर्वी शिवसेनेकडून अनंत तरे यांना उमेदवारी देण्यात आली. तेव्हा ते तर रत्नागिरी जिल्ह्यातीलही नव्हते.
त्यामुळे आमदार आमदार भास्कर जाधव यांनी याचीही माहीती घ्यावी असा अप्रत्यक्ष सल्ला तटकरे यांनी दिला.