रत्नागिरी : शिथिलता दिल्यामुळेच नागरिकांनी नियम धाब्यावर बसवले. आज त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा लॉकडाउन करण्यात आले आहे.

त्याचे निर्बंध मंगळवारपासून लागू केले जाणार आहेत. दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी अधिक कडक केली जाईल. नागरिकांनी सात दिवस निर्बंध पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. दररोज पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये वाढ होत आहे.त्यामुळे प्रत्येकाने दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. दुसऱ्या लाटेशी लढा देण्यासाठी आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासन सज्ज आहे.

प्रत्येक रुग्णाला आरोग्य सेवा मिळावी यासाठी महिला रुग्णालयात १२५ अतिरिक्त बेड तयार करण्यात येणार आहेत. तर रत्नागिरी नगर पालिका ५० बेड, समाजकल्याण कार्यालय ५० बेड, बीएड महाविद्यालयात १०० बेड असे ३२५ अतिरिक्त बेड तयार करण्याची सुचना ना. उदय सामंत यांनी आरोग्य विभागाला केली आहे.

राज्य शासनाने रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शहरात नाकाबंदी आज पासून सुरू करण्यात येणार आहे. तर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आवश्यकता असल्यास महाविद्यालये ताब्यात घेतली जातील. रुग्णालयांनी ऑक्सीजनची उपलब्धता करून ठेवण्याचे आदेश ना. सामंत यांनी दिले आहेत.

वैद्यकीय महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयात सेवा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे आदेश आरोग्य विभागाने काढल्याचे ना सामंत यांनी सांगितले.

४५ पेक्षा जास्त वय असलेले ६ लाख ५० हजार नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यांपैकी ८६ हजार जणांना लस देण्यात आली आहे.उर्वरित नागरीकांना लसीकरण सुरू आहे.

कोरोनाची चेन तोडण्यासाठी मुख्यमंत्री ना उद्धव ठाकरे यांनी सर्व राजकीय पक्ष,घटक यांच्याशी चर्चा करून काही बंधने घातली आहेत. त्याला जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य करावे.सर्वांनी एकत्रित पणे कोरोनाचा सामना करूया असे आवाहन ना सामंत यांनी केले आहे.