मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 55 लाख रूपयांची कंपनीकडून मदत

रत्नागिरी : लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा केमिकल्स या केमिकल उत्पादक कंपनी च्या प्लांटमध्ये असणाऱ्या सातव्या युनिट मध्ये आज एक दुर्घटना घडली यात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

या अपघातात एक कामगार गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले आहे.
या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 55 लाख रुपये देण्यात येतील असे घरडा केमिकल्स तर्फे सांगण्यात आले आहे. जखमी असणाऱ्या कामगाराच्या उपचारासाठी वीस लाख रुपये कंपनी देणार आहे.

भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तातडीने जाहीर केला आहे. सोबतच या ठिकाणी पोलीस यंत्रणा आपले वेगळे नियंत्रण कक्ष सुरू करेल.

हा सर्व औद्योगिक परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली यापुढील काळात राहील याबाबतही कार्यवाही करण्यात येत आहे.

या दुर्दैवी घटनेत मरण पावलेल्या कामगारांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यास सोबतच त्यांना रोजगार मिळण्याच्या बाबत कार्यवाही करण्यात येईल.

या दुर्दैवी घटनेची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली असून पालकमंत्री अनिल परब यांनीही याबाबत माहिती घेतली.

नियोजित कार्यक्रम रद्द करून मंत्री उदय सामंत यांची घटनास्थळी धाव

घटनास्थळी पाहणी करताना ना. उदय सामंत

चिपळूण तालुक्यातील लोटे एमआयडीसीतील घरडा कंपनीत स्फोट झाल्याची माहिती समजताच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून अपघातस्थळी भेट दिली.

यावेळी उदय सामंत यांनी अपघातातील जखमींना तत्काळ उपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागास सूचना केल्या.