बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

योग्य संधी मिळाल्यास आदिवासी मुले खेळात करिअर घडवतील; प्रयोगभूमीत कला-क्रीडा उत्सव उत्साहात

योग्य संधी मिळाल्यास आदिवासी मुले खेळात करिअर घडवतील; प्रयोगभूमीत कला-क्रीडा उत्सव उत्साहात

चिपळूण : आदिवासी मुले खेळात निपुण असून, त्यांना योग्य संधी व मार्गदर्शन मिळाल्यास ती खेळाद्वारे आपले करिअर घडवू शकतात, असे प्रतिपादन चिपळूण येथील परांजपे मोतीवाले हायस्कूलच्या मुख्याध्यापक तथा क्रीडा प्रशिक्षक अंकिता पवार यांनी केले.

श्रमिक सहयोग संचलित कोळकेवाडी येथील प्रयोगभूमी शिक्षण केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय कला व क्रीडा उत्सवाच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या.

मुलांनी स्वप्न पाहायला शिकले पाहिजे आणि करिअरमध्ये नेमके काय करायचे आहे हे हेरून आपला दिनक्रम ठरवला पाहिजे, त्यासाठी सातत्य आणि शारीरिक तंदुरुस्तीवर लक्ष देणे आवश्यक असल्याचेही पवार यांनी यावेळी नमूद केले.

श्रमिक सहयोग संस्थेच्या वतीने शनिवार आणि रविवार (दि. २१ व २२ नोव्हेंबर) असे दोन दिवस या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये संस्थेने चालवलेल्या वाडी शिक्षण केंद्रातील ५ ते १५ वयोगटातील ९२ मुले-मुली सहभागी झाली होती. उत्सवाच्या पहिल्या दिवशी सावर्डे येथील सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट्समधील प्रदीपकुमार देंडगे, कला शिक्षक परशुराम गावण आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी चित्रकलेचे सत्र घेतले.

दुपारनंतर कबड्डी आणि खो-खो स्पर्धा पार पडल्या, तर संध्याकाळी राकेश प. मि. यांनी बौद्धिक खेळांचे सत्र घेतले. रात्री बांडगी, गौंडी, कलरी आणि जाखडी यांसारख्या पारंपरिक व सांघिक नृत्यांमध्ये सर्व मुले, शिक्षक आणि कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते.

दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत धावणे, लांब उडी आणि कबड्डीचे अंतिम सामने रंगले. या सर्व खेळांसाठी अलोरे हायस्कूलचे जीवन पाटील आणि पोफळी हायस्कूलचे प्रदीपकुमार यादव यांनी पंच म्हणून काम पाहिले.

त्यानंतर झालेल्या समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजन इंदुलकर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक अंकिता पवार, श्रमिक सहयोगचे संस्थापक विश्वस्त भार्गव पवार, कार्यवाह सुषमा इंदुलकर, व्यवस्थापक गणेश खेतले आणि आदिम आदिवासी कातकरी संघटनेचे जिल्हा सचिव महेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी सहभागी मुलांपैकी पाच प्रतिनिधींनी आपली मनोगते व्यक्त केली, त्यानंतर सर्व मुलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. दोन दिवस चाललेला हा उत्सव यशस्वी करण्यासाठी मंगेश मोहिते, रेखा मोहिते, विठ्ठल निकम, पूजा जाधव, अजय निकम, अजित पवार, स्नेहा बोलाडे या शिक्षकांनी तसेच प्रयोगभूमीतील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Ankita Pawar, Art and Sports Festival, Chiplun News, Kabaddi competition, kolkewadi, prayogbhumi, ratnagiri news, Shramik Sahayog, Traditional Dance, Tribal Children

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *