रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या वतीने जिल्हाध्यक्ष वर्षा परशुराम ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या बैठकीला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तसेच रत्नागिरी दक्षिण अंतर्गत येणाऱ्या विविध मंडळांच्या महिला मोर्चा अध्यक्षाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
वर्षा ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या बैठकीत महिला मोर्चाच्या आतापर्यंतच्या संघटनात्मक कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महिला मोर्चाच्या माध्यमातून महिलांसाठी राबविण्यात आलेले विविध सामाजिक उपक्रम, महिला सक्षमीकरणासाठी केलेले प्रयत्न तसेच आगामी काळात हाती घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांबाबत सखोल विचारमंथन झाले.
बैठकीमध्ये संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवणे, जनसंपर्क वाढवणे आणि प्रसिद्धी माध्यमांचा प्रभावी वापर करणे या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यासोबतच आगामी कार्यक्रमांची आखणी आणि पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांचे नियोजनही यावेळी निश्चित करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे म्हणाल्या की, महिला मोर्चा ही केवळ एक राजकीय संघटना नसून ती महिलांच्या सन्मानासाठी, स्वावलंबनासाठी आणि सक्षम समाजनिर्मितीसाठी कार्य करणारी शक्ती आहे.
त्यामुळे प्रत्येक महिला पदाधिकाऱ्याने सक्रियपणे आणि जबाबदारीने काम करून संघटना अधिक बळकट करावी, असे आवाहन त्यांनी केले. महिलांचे संघटन, सक्षमीकरण आणि समाजहिताचे उपक्रम राबवून भाजपा महिला मोर्चाचे कार्य अधिक व्यापक करण्याचा निर्धार या बैठकीच्या निमित्ताने करण्यात आला.

Leave a Reply