रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचे निकटवर्तीय राजाभाऊ लिमये यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले.
गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी सायंकाळी सात वाजता रत्नागिरी शहरातील टिळक आळी येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.
राजाभाऊ लिमये यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात राजकारण, सहकार, कृषी, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या.
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासकामांना चालना दिली. तसेच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी सहकार क्षेत्रात भरीव योगदान दिले.
नारळ उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या नारळ विकास मंडळाचे अध्यक्षपद आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कोकण विभागीय अध्यक्षपदही त्यांनी दीर्घकाळ भूषवले.
विविध संस्थांच्या माध्यमातून कोकणच्या विकासाशी संबंधित प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केले.
सहकार आणि सामाजिक प्रश्नांचा सखोल अभ्यास असलेले अनुभवी नेतृत्व आणि ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांचा जिल्ह्यात मोठा लौकिक होता.
शरद पवार यांच्याशी असलेल्या जुन्या आणि निकटच्या संबंधांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळातही त्यांना विशेष स्थान होते. त्यांच्या निधनाने रत्नागिरी जिल्ह्याने राजकारण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील एक मार्गदर्शक नेतृत्व गमावले असून, सर्वच राजकीय पक्षांतील नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि मोठा चाहतावर्ग असा परिवार आहे.

Leave a Reply