रत्नागिरी : सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत समाजातील वंचित, गरजू आणि सर्वसामान्य घटकांच्या उन्नतीसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या नाझीमा रमजान गोलंदाज यांना भारतीय कष्टकरी रयत सेवा संस्थेच्या (भाकर) वतीने सन २०२६–२७ चा प्रतिष्ठेचा ‘अरुणा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नाझीमा गोलंदाज यांनी शिक्षण आणि समाजसेवेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देणे, महिलांना सक्षम बनविणे आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, अशा विविध माध्यमांतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी आणि आर्थिक परिस्थितीमुळे कोणाचेही नुकसान होऊ नये, या उद्देशाने गोलंदाज यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठा पुढाकार घेतला आहे.

नवनिर्मिती फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक येथील न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने जगता यावे आणि शिक्षणाच्या माध्यमातून नव्या पिढीला प्रगतीची दिशा मिळावी, या विचारातून त्या काम करत आहेत.

सामाजिक विकास हा केवळ शासकीय योजनांवर अवलंबून नसून संस्था आणि व्यक्तींनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, याच भूमिकेतून त्या आपले योगदान देत आहेत.

समाजासाठी निःस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या नाझीमा गोलंदाज यांना मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या कार्याची पोचपावती मानली जात आहे.

या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला अधिक व्यापक ओळख मिळणार असून, सामाजिक क्षेत्रात अधिक जोमाने काम करण्यासाठी नवी प्रेरणा मिळेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी शासनाचा समाजभूषण पुरस्कार प्राप्त दिलीप रेडकर, वकील समीर जाधव, संस्थेचे संस्थापक देवेंद्र पाटील, सचिव अश्विनी मोरे, उद्योजक संजय सूर्यवंशी, निलेश जाधव, रोशन कांबळे, अभिजित किंजले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.