देवरुख: केंद्र शासनाच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे (DCS MH) मोबाईल ॲपद्वारे खरीप हंगाम २०२६-२७ करिता सुरू असलेल्या पीक पाहणी मोहिमेत संगमेश्वर तालुक्यातील मुरादपूर गावाने आपले सर्वेक्षण पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात या ॲपद्वारे ११ ऑगस्ट ते १० नोव्हेंबर २०२६ या निर्धारित कालावधीत शंभर टक्के पीक नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या मोहिमेअंतर्गत सर्व गट क्रमांक व सर्वे क्रमांकनिहाय प्रत्यक्ष पिकांची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित करून क्रॉप रजिस्ट्री अद्ययावत केली जात आहे.

या डिजिटल पीक नोंदणीच्या माहितीचा उपयोग विविध कृषी योजना, पीकविमा भरपाई, आपत्ती व्यवस्थापन मदत, कृषी सांख्यिकी तसेच ॲग्रीस्टॅक प्रकल्पांतर्गत महत्त्वपूर्ण कामांसाठी केला जाणार आहे.

मुरादपूर गावामध्ये एकूण १२८२ सर्व्हे प्लॉट असून, येथील अडचणीच्या ठिकाणी प्रत्यक्ष पोहोचून महसूल सेवक तथा पीक पाहणी सहायक प्रथमेश गांगण याने अत्यंत समर्पित भावनेने हे काम पूर्ण केले आहे.

संगमेश्वर तालुक्यातील मुरादपूर गावाने मारली बाजी; डिजिटल पीक पाहणी सर्वेक्षण १०० टक्के पूर्ण करणारे ठरले पहिले गाव! या उल्लेखनीय यशात ग्राम महसूल अधिकारी जयश्री पाटील आणि देवरुखचे मंडळ अधिकारी रोहित पाठक यांचे मोलाचे योगदान लाभले.

संगमेश्वरच्या तहसीलदार अमृता साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. दरम्यान, शासन निर्देशानुसार १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पीक नोंदणीचे काम १०० टक्के पूर्ण करण्यासाठी ज्यांच्या शेतीची पीक पाहणी अद्याप झालेली नाही, त्यांनी लवकरात लवकर आपली पीक पाहणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने संगमेश्वर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.