रत्नागिरी : महाराष्ट्र सध्या कोरड्या दुष्काळाचा सामना करत असून ग्रामीण भागातील शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला याचा मोठा फटका बसत आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील सर्व विद्यापीठांना दुष्काळग्रस्त भागातील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत करण्याचे निर्देश दिले होते.

मुंबई विद्यापीठाने दिलेल्या या निर्देशांची तत्काळ अंमलबजावणी करत पाली येथील डी. जे. सामंत सिनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची परीक्षा फी अवघ्या एका दिवसात त्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाइन जमा केली आहे.

राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तथा महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष उदय सामंत यांच्या सूचनेनुसार ही जलद कार्यवाही करण्यात आल्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या पालक वर्गातून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी मुलांसाठी उच्च शिक्षणाची संधी गावातच उपलब्ध व्हावी, या उद्देशाने उदय सामंत यांच्या संकल्पनेतून पंचवीस वर्षांपूर्वी साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली होती.

या संस्थेअंतर्गत डी. जे. सामंत वरिष्ठ महाविद्यालय, आयटीआय आणि इंग्रजी माध्यमाची शाळा चालवली जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरात जाताना होणारा आर्थिक भुर्दंड आणि शारीरिक त्रास कमी करणे हा यामागचा मुख्य उद्देश होता.

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पालकांना आर्थिक चणचण भासत असतानाही त्यांनी मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी कशीबशी परीक्षा फी भरली होती.

मात्र, रत्नागिरी तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये झाल्याने शासनाच्या आणि मुंबई विद्यापीठाच्या निर्देशानुसार ही फी तत्काळ परत करण्यात आली आहे.

एकाच दिवसात फीचे पैसे थेट खात्यात जमा झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्यात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.