रत्नागिरी : येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर राज्यस्तरीय १९ वर्षांखालील शालेय क्रिकेट स्पर्धेचे अत्यंत उत्साहात उद्घाटन झाले.
यावेळी प्रशासकीय कामकाजाची चौकट बाजूला ठेवून जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी थेट क्रिकेटच्या मैदानात उतरत फलंदाजीचा आनंद लुटला.

जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी टाकलेल्या चेंडूवर जिल्हाधिकाऱ्यांनी सुरेख चौकार लगावत स्पर्धेचा अनोख्या पद्धतीने शुभारंभ केला.
केवळ फीत कापून औपचारिकता न पाळता हातात बॅट घेऊन मैदानात उतरलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या या दिलखुलास कृतीने उपस्थित युवा खेळाडू, पंच आणि क्रीडारसिकांची मने जिंकली.
त्यांच्या या अनपेक्षित आणि उत्साहवर्धक खेळीमुळे स्पर्धेच्या पहिल्याच दिवसाची सुरुवात अविस्मरणीय ठरली आणि खेळाडूंना नवा आत्मविश्वास मिळाला.

राज्यातील क्रिकेटपटूंच्या गुणवत्तेला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या मानाच्या स्पर्धेत कोल्हापूर, मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि पुणे अशा आठ विभागांचे संघ सहभागी झाले आहेत.
पहिल्या दिवशी झालेल्या सामन्यांमध्ये पुणे आणि मुंबईच्या संघांनी दमदार विजय नोंदवले. पहिल्या सामन्यात पुणे विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
पुण्याच्या रुषभ मोरे याने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे अमरावतीचा संघ १० षटकांत ९ बाद ३७ धावांवर मर्यादित राहिला. ३८ धावांचे माफक आव्हान पुण्याच्या नेहाल मुल्ला याने अवघ्या १२ चेंडूंमध्ये नाबाद २८ धावा फटकावून २.३ षटकांत एकही गडी न गमावता सहज पूर्ण केले आणि संघाच्या एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केले.

दुसऱ्या अत्यंत चुरशीच्या लढतीत कोल्हापूर विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पृथ्वेश जाधव याच्या ४६ धावांच्या जोरावर १० षटकांत २ बाद ९८ धावांचा मजबूत डोंगर उभारला.
या ९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांनी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या लढतीत १० षटकांत ३ गडी गमावून १०० धावा करत थरारक विजय नोंदवला. मुंबईच्या या विजयात ओम् बांगर याने साकारलेली ६० धावांची तुफानी खेळी निर्णायक ठरली.
या उद्घाटनप्रसंगी निवड समिती सदस्य सर्वेश देशमुख, दीपक मोरे, संदीप गावंडे, तालुका क्रीडा अधिकारी सुनील धारूरकर, क्रीडा अधिकारी गणेश खैरमोडे, सुनील कोळी आणि गणेश जगताप यांच्यासह पंच व अनेक क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

