रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अंबवली गावात सत्तेच्या झगमगाटापेक्षा मातीची नाळ आणि सामान्यांचा जिव्हाळा अधिक मोलाचा असतो, याची प्रचिती देणारा एक अनोखा प्रसंग नुकताच पाहायला मिळाला.
‘आपल्या माणसांत, आपल्या वस्तीवर’ या सहज आणि सुंदर भावनेतून राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी अंबवलीतील देवळवाडी येथे ‘आपुलकीचा मुक्काम’ करत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.
संध्याकाळच्या वेळी देवळवाडीत दाखल झालेल्या योगेश कदम यांचे स्वागत कोणत्याही औपचारिक प्रोटोकॉलने नव्हे, तर कोकणी माणसाच्या अथांग प्रेमाने आणि पारंपरिक उत्साहाने करण्यात आले.
भारतीय सैन्यदलात देशसेवा बजावलेल्या यादव कुटुंबाच्या सुमारे ६० वर्षे जुन्या, शेणाने सारवलेल्या आणि कौलारू कोकणी घरात त्यांनी रात्रभर मुक्काम केला.
तिथे चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद घेत आणि जुन्या बैठकीत बसून त्यांनी कोकणच्या अस्सल संस्कृतीचा, साधेपणाचा व ग्रामीण जीवनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
रात्रीच्या शांत वातावरणात घराच्या पडवीत बसून यादव कुटुंबीय आणि ग्रामस्थांशी रंगलेल्या गप्पांमुळे ते केवळ लोकप्रतिनिधी नव्हे, तर कुटुंबातीलच एक सदस्य असल्याचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी गावातील पाण्याचे प्रश्न, रस्ते, आरोग्य, शेती आणि रोजच्या जगण्यातील आव्हाने त्यांनी अत्यंत बारकाईने ऐकून घेतली.
या संवादादरम्यान भावना व्यक्त करताना योगेश कदम यांनी स्पष्ट केले की, विकासाची खरी व्याख्या ही मंत्रालयाच्या फाईलींमधून नव्हे, तर खेड्यापाड्यातील घरांच्या उंबरठ्यावरून ठरते.
सामान्य माणसाच्या डोळ्यांतील अपेक्षा आणि त्याच्या रोजच्या संघर्षाची जाणीव असणे हे लोकप्रतिनिधीचे आद्यकर्तव्य असून अंबवलीत मिळालेली मायेची ऊब आणि निखळ आपुलकी मनात कायम घर करून राहील, असे ते म्हणाले.
जनसंवादाचा हा नवा अध्याय केवळ घोषणा आणि दौऱ्यांपुरता मर्यादित न राहता, थेट ग्रामस्थांच्या अंगणात जाऊन त्यांच्या समस्या समजून घेणारा ठरल्याने हा उपक्रम कोकणात विशेष चर्चेचा विषय बनला आहे.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रत्यक्ष जागेवर जाऊन सोडवण्यासाठी आणि प्रशासनाला लोकाभिमुख करण्यासाठी ही संवेदनशील पावले अत्यंत प्रभावी ठरतील, असा विश्वास परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

