दापोली : निवडणुकीच्या उमेदवारी अर्जावरून सुरू असलेल्या प्रक्रियेत सुधीर कालेकर यांनी त्यांच्या उमेदवारीवर स्मिताली राजपुरे यांनी घेतलेल्या आक्षेपाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
३० वर्षे एकाच पदावर राहिल्याचे कारण देत स्मिताली राजपुरे यांनी सुधीर कालेकर यांच्या निवडणूक लढवण्यावर हरकत घेतली होती. यावर बोलताना कालेकर यांनी या तक्रारीच्या स्वरूपाबाबत आश्चर्य आणि काहीशी नाराजी व्यक्त केली.
सरकारी नियमानुसार ३० वर्षांच्या कार्यकाळाचा दाखला देऊन उमेदवारी अर्जावर हरकत घेणे एकवेळ समजण्यासारखे होते, मात्र थेट मतदार यादीतूनच नाव वगळण्याची मागणी करणे ही अवास्तव आणि अतिउत्साही कृती असल्याचे ते म्हणाले.
मतदानाचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून तो अशा प्रकारे नाकारण्याची मागणी करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच, ३० वर्षांच्या कार्यकाळाबाबतचे नियम हे केंद्र सरकारच्या निर्णयावर आधारित असून ते सर्वांसाठी समान लागू होतात, असे त्यांनी नमूद केले.
कायदेशीर आणि घटनात्मक प्रक्रियेच्या गैरसमजातून अशा प्रकारच्या हरकती घेतल्या जात असाव्यात, असे मत त्यांनी संयमाने व्यक्त केले.
उमेदवारी रद्द होण्याच्या शक्यतेबाबत बोलताना, हे सर्व निवडणूक प्रक्रियेचे भाग असून त्याबाबत कोणतीही चिंता नसल्याचे कालेकर यांनी स्पष्ट केले.
तसेच, अशा प्रकारच्या हरकतींमधून विरोधकांची साशंकता दिसून येते, असे सांगत त्यांनी या विषयावरील आपली बाजू अत्यंत शांतपणे मांडली.

