दापोली : एकात्मिक बाल विकास सेवा योजना दाभोळ प्रकल्पांतर्गत फणसू बीटमधील सर्व अंगणवाडी मदतनिसांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेला ‘पोषण माह’ सांगता समारंभ देगाव ग्रामपंचायत सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला.
महिनाभरात राबवण्यात आलेल्या विविध पोषण आणि आरोग्यविषयक उपक्रमांची यशस्वी सांगता या कार्यक्रमाद्वारे करण्यात आली. या समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोलांबडे उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी बालकांचे पोषण, गरोदर व स्तनदा मातांचे आरोग्य आणि सकस आहाराचे दैनंदिन जीवनातील महत्त्व उपस्थितांना पटवून दिले.
अंगणवाडी मदतनिसांनी एकत्र येऊन केलेल्या या विशेष आयोजनाचे त्यांनी विशेष कौतुक केले. याप्रसंगी देगाव गावच्या माजी सरपंच भोसले यांच्यासह उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.

गावात आरोग्य आणि पोषणाचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास बीटच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य विभागाचे कर्मचारी, फणसू बीटमधील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच गावातील महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोषण आहाराचे महत्त्व आणि आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचा संकल्प करत या एका महिन्याभराच्या मोहिमेची यशस्वी सांगता करण्यात आली.


