दापोली: दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित हर्णै-पाजपंढरी येथील श्रीराम हायस्कूलमध्ये नुकतीच विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली.
यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक अर्जुन घुले, पुणे येथील लक्ष इन्स्टिट्यूटचे संचालक आणि मार्गदर्शक किशोर आंबेगावकर, मीनाक्षी नागदिवे, राजेश महाडिक, दिगंबर पावसे, मोहन पडवेकर आणि ओंकार बेडेकर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरुवातीला मुख्याध्यापक अर्जुन घुले यांच्या हस्ते किशोर आंबेगावकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर आंबेगावकर यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध वाटांबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
या सत्रात तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक आणि कौशल्याधारित शिक्षण तसेच उपलब्ध रोजगाराच्या संधी याबाबत उपयुक्त माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी केवळ प्रवाहाच्या मागे न जाता स्वतःची आवड आणि अंगभूत कौशल्यांचा विचार करूनच भविष्यातील करिअरची निवड करावी, असा महत्त्वाचा सल्ला यावेळी देण्यात आला. कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून तज्ञांकडून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
या शैक्षणिक उपक्रमाला विद्यार्थ्यांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार दिगंबर पावसे यांनी मानले.

