रत्नागिरी : जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील तिडे आदिवासीवाडी येथून एक महिला आणि रत्नागिरी तालुक्यातील खेडशी येथून एक युवक अशा दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन व्यक्ती बेपत्ता झाल्या आहेत.

याबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंडणगड तालुक्यातील तिडे आदिवासीवाडी येथील ताई शांताराम जाधव या ५६ वर्षीय महिला २७ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाल्या आहेत.

त्यांची उंची ४ फूट ३ इंच असून वर्ण निमगोरा, चेहरा गोल, नाक सरळ आणि डोळे काळे आहेत. बेपत्ता होताना त्यांनी लाल रंगाची साडी आणि त्यावर पिवळ्या रंगाचा बारीक फुलांची नक्षी असलेला ब्लाऊज परिधान केला होता, तसेच त्यांच्या गळ्यात काळ्या मण्यांचे मंगळसूत्र आहे.

या महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ मंडणगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. दुसऱ्या एका घटनेत, रत्नागिरी तालुक्यातील खेडशी येथील मोरया एकतानगरमधील सुयोग उत्तम कोलगे हा २६ वर्षीय तरुण २० ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून निघून गेला असून तो अद्याप घरी परतलेला नाही.

त्याची उंची ५ फूट ३ इंच, वर्ण गोरा, चेहरा उभा आणि बारीक बांधा असून त्याला दाढी व मिशी आहे. अंगात निळ्या रंगाचा फुलांचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची फुल जीन्स त्याने परिधान केली आहे. त्याच्याकडे मोटो कंपनीचा टॅब, आयफोन आणि एमएच ०८ एएच ४२३७ या क्रमांकाची मरून रंगाची ॲक्टिव्हा दुचाकी आहे.

सुयोग कोलगे याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास अथवा तो आढळून आल्यास रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.