दापोली : तालुक्यातील दाभोळजवळील वणौशी-खोंडारण परिसरात ३० सप्टेंबरच्या रात्री शिकारीसाठी गेलेल्या दोघांवर काळाने घाला घातला आहे.

शिकारीदरम्यान गावठी बनावटीच्या बंदुकीतून अचानक मिसफायर होऊन लागलेल्या गोळ्यांच्या छर्र्यांमुळे सचिन शांताराम शिगवण या ४४ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर सुनील पांध्ये हा ४८ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.

या दुर्दैवी घटनेने संपूर्ण खोंडारण आणि दाभोळ परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन शिगवण आणि सुनील पांध्ये हे दोघे रात्रीच्या सुमारास वणौशी-खोंडारण परिसरातील जंगलात शिकारीसाठी गेले होते.

शिकारीचा शोध सुरू असतानाच त्यांच्याकडील गावठी बंदुकीतून अनपेक्षितपणे गोळी सुटली. या मिसफायरमध्ये सचिन शिगवणच्या पोटात आणि पोटाच्या खालच्या भागात अंदाजे चार ते पाच छर्रे घुसल्याने तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

याच वेळी जवळच उभा असलेल्या सुनील पांध्येच्या मांडीलाही दोन ते तीन छर्रे लागल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जखमी सुनील पांध्येला तात्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच दाभोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनाम्याची कार्यवाही सुरू केली.

पोलिसांनी घटनास्थळावरून आवश्यक पुरावे ताब्यात घेतले असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

प्राथमिक चौकशीत ही घटना बंदुकीचा मिसफायर झाल्यामुळेच घडल्याचे समोर येत असले, तरी गोळीबार नेमका कसा झाला, शस्त्र कोणाचे होते आणि ते अधिकृत होते का, या सर्व बाबींचा पोलीस बारकाईने तपास करत आहेत.

दरम्यान, ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी केल्या जाणाऱ्या बेकायदेशीर शिकारी आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या असुरक्षित गावठी बनावटीच्या शस्त्रांचा गंभीर प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणी दाभोळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.