पाडले (दापोली) : येथे क्षितिज कलामंचच्या वतीने नुकताच एक अभिनव वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
केवळ वृक्षारोपण करून औपचारिकता पूर्ण करण्याऐवजी, रोपांच्या संगोपनाची जबाबदारी थेट ग्रामस्थांवर सोपवणारी आगळीवेगळी संकल्पना या मोहिमेत राबवण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान गावातील नागरिकांना रोपांचे वाटप करून त्यांच्या घराच्या आवारात ती लावण्यात आली.

रोपे लावल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष होते आणि ती जगण्याचे प्रमाण रोडावते, हा अनुभव लक्षात घेऊन प्रत्येक कुटुंबाला रोपाची देखरेख करण्याची व ती जोपासण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि वातावरणातील वाढते तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी वृक्षारोपण आणि पर्यावरणाचे संरक्षण अत्यंत गरजेचे असते.

झाडे ही केवळ ऑक्सिजनचा मुख्य स्रोत नसून परिसंस्थेचे रक्षक आहेत.
क्षितिज कलामंचने राबवलेल्या या उपक्रमामुळे केवळ रोपे जगण्यास मदत होणार नाही, तर भविष्यात नागरिकांना फळे आणि फुलांच्या रूपाने लाभही मिळतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या पर्यावरणपूरक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्षितिज कलामंचाचे अध्यक्ष अभिजीत भोंगले, संस्थापक सुनील कदम, दिगंबर पावसे आणि रुपेश सावंत आदींनी विशेष परिश्रम घेतले.
ग्रामस्थांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद या मोहिमेच्या यशाची साक्ष देणारा ठरला.


