पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं उद्घाटन

खेड : कोकणातील समृद्ध निसर्ग, जैवविविधता आणि परिसंस्थेचे जतन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पर्यावरणशास्त्रावर आधारित सखोल संशोधन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन उद्योग तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

खेड तालुक्यातील सात्विणगाव येथे वन विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘निसर्ग माहिती केंद्रा’च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या पर्यावरणपूरक कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक वटवृक्ष पूजनाने करण्यात आली.

यावेळी माजी आमदार संजय कदम, विभागीय वन अधिकारी गिरजा देसाई, प्रांताधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार सुधीर सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य राजू आंब्रे, संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोहर दिवाले, शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते.

स्थानिक पिकांसोबतच कोकणातील पर्यावरणीय घटकांवर उच्च दर्जाचे संशोधन होणे काळाची गरज असल्याचे पालकमंत्र्यांनी नमूद केले. सह्याद्रीच्या पट्ट्यातील वन्यजीव संपदा, जैवविविधतेचे अधिवास आणि त्यांच्या संरक्षणामागील शास्त्रीय बाजू अभ्यासण्यासाठी शाळा व महाविद्यालयांनी स्वतंत्र पर्यावरण अभ्यासक्रम सुरू करावेत.

अशा उपक्रमांना जिल्हा नियोजन समिती आणि सिंधुरत्न योजनेतून सढळ हाताने निधी पुरवला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. फक्त पर्यटनापुरते मर्यादित न राहता हे माहिती केंद्र पर्यावरण अभ्यास, वन्यजीव निरीक्षण आणि निसर्ग संवर्धनाचे मुख्य केंद्र व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सह्याद्रीच्या खोऱ्यातील वन्यजीवांची भ्रमणक्षमता, दुर्मिळ वनस्पती आणि एकूणच परिसंस्थेचे संतुलन समजून घेण्यासाठी हे केंद्र विद्यार्थ्यांना एक हजारी व्यासपीठ उपलब्ध करून देईल.

वन विभागाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करत या प्रकल्पामुळे नागरिक आणि पर्यटकांमध्ये पर्यावरण जाणिवा प्रगल्भ होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय वन अधिकारी गिरजा देसाई यांनी तर आभार सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड यांनी मानले.