दापोली : अर्बन बँकेच्या सभासद आणि ठेवीदारांच्या अपघात विमा रकमेत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संचालक मंडळाने घेतला असून, यामुळे बँकेच्या घटकांना अधिक सुरक्षा कवच मिळणार आहे. बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगांवकर यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

यापूर्वी एक हजार रुपयांचे शेअर्स धारण केलेल्या सभासदाचा दोन लाखांचा अपघात विमा उतरवला जात होता, ती मर्यादा आता तीन लाख रुपये करण्यात आली आहे.

तसेच पन्नास हजारांपेक्षा अधिक ठेवी असलेल्या ठेवीदारांचा पाच लाखांचा अपघात विमा आता सात लाख रुपये करण्यात आला आहे. काही प्रकरणांमध्ये सभासदाचा दहा लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा उतरवून त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे बँकेवर दरवर्षी ३५ ते ४० लाख रुपयांचा विमा हप्त्याचा भार पडणार आहे, तरीही सामाजिक बांधीलकी जपून हा धाडसी निर्णय घेतल्याचे जालगांवकर यांनी नमूद केले.

बँकेच्या वतीने केवळ विमा संरक्षणच नव्हे, तर सध्या वाढत्या सायबर फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे.

एसएमएस, फिशिंग मेल, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून सायबर ठगांकडून प्रलोभने दाखवणे, ओटीपी विचारणे किंवा धार्मिक भावनांच्या आधारे फसवणूक करण्याचे प्रकार घडत आहेत.

या धोक्यापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी बँकेतर्फे मार्गदर्शक सूचना असलेले माहितीपत्रक जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळे, जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये वाटण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ संचालक माधव शेट्ये, संचालक संदिप खोचरे, आशिष मेहता, अशोक जाधव तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी थोरात उपस्थित होते.

Advertisement