रत्नागिरी : जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील भिंगळोली येथील श्रद्धा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलवर प्रशासनाने मोठी कारवाई करत येथील सोनोग्राफी सेंटर सील केले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक बी. व्ही. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय पथकाने ही धडक कारवाई पार पाडली.
पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन आणि मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या गैरप्रकारांमुळे ही कारवाई करण्यात आली असून, आरोग्य वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
1 सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय पथकाने या हॉस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटरवर थेट डिकॉय कारवाई केली.

या अचानक केलेल्या तपासणीदरम्यान अनेक धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आले.
नियमानुसार केंद्रात नोंदणीकृत तज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुमन व्यास अनुपस्थित असताना, कायद्यानुसार सोनोग्राफी करण्यास अजिबात सक्षम नसलेल्या संबंधित महिला डॉक्टर स्वतः सोनोग्राफी करत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.
विशेष म्हणजे, नोंदणीकृत तज्ज्ञ डॉक्टर गैरहजर असतानाही त्यांच्या नावाचा बोगस शिक्का वापरून वैद्यकीय अहवालांवर स्वाक्षऱ्या केल्या जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
याशिवाय, सेंटरच्या कागदपत्रांची कसून छाननी केली असता आणखी एक गंभीर बाब समोर आली. स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून नोंदणीकृत असलेल्या सुमन व्यास या पुरुष रुग्णांची देखील सोनोग्राफी करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले.
पीसीपीएनडीटी कायद्यातील नियमांचा अशा प्रकारे थेट बोजवारा उडवल्याचे आणि मोठे गैरप्रकार सुरू असल्याचे उघड झाल्यानंतर, जिल्हा प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता तत्काळ पावले उचलली आणि संबंधित सोनोग्राफी मशीन तात्काळ प्रभावाने सील केले.
डॉ. प्रसाद प्रभाकर आंबेकर यांच्या मालकीच्या या हॉस्पिटलमधील या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इतर केंद्रांचेही या निमित्ताने धाबे दणाणले आहेत.

