रत्नागिरी : जिल्ह्यातील हापूस आंब्याच्या हंगामाचे चित्र यंदा बदलत्या हवामानामुळे पुरते विस्कटलेले आहे. नेहमी हिवाळ्यात येणारा आंब्याचा मोहोर यंदा चक्क ऑगस्टच्या अखेरीस, म्हणजेच भर पावसाळ्यातच फुलल्याने आंबा बागायतदार चिंतेत पडले आहेत.

यंदा मान्सून कालावधी अनियमिततेच्या गर्तेत अडकलेला असून जून महिन्यातील कोरडे दिवस आणि ऑगस्टमध्ये अनेकवेळा जाणवणारा उन्हाचा कडाका यामुळे हे चित्र निर्माण झाले आहे.

सलग दोन ते तीन दिवस पावसाने घेतलेली विश्रांती आणि त्यानंतर अचानक पडलेले कडक ऊन याचा थेट परिणाम हापूस आंबा कलमांवर झाला आहे.

गणपतीपुळे आणि पावस परिसरातील कातळ भागातील हापूस आंबा कलमांना वेळेआधीच मोठ्या प्रमाणावर मोहोर आल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या हंगामात मे महिन्यात झाडांना आलेली पालवी जूनमध्ये परिपक्व झाली आणि आता पावसाच्या उघडीपनंतर पडलेल्या उन्हामुळे या परिपक्व पालवीतून अवकाळी मोहोर बाहेर पडत आहे.

विशेषतः कातळभागातील जुन्या व नव्या कलमांवर हा मोहोर अधिक दिसून येत असून यंदा याचे प्रमाण अधिक असल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे.

हा अवकाळी मोहोर गळून गेल्यास मुख्य हंगामाच्या वेळी झाडांना पुन्हा मोहोर येईल का, याबाबत बागायतदारांच्या मनात मोठी शंका आहे. हवामानातील या अनियमिततेमुळे मुख्य आंबा हंगामाचे चक्र बिघडण्याची भीती असून आगामी मोसम पुढे ढकलला जाऊ शकतो किंवा उशिरा सुरू होऊ शकतो.

यामुळे यंदा उत्पादन घटण्याची व बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात येणारा हा अवकाळी मोहोर पावसामुळे टिकून राहणे अत्यंत कठीण असते.

सततचा पाऊस, हवेतील दमटपणा आणि कीड-रोगांमुळे हा मोहोर गळून जाण्याची भीती असल्याने त्यावर कीटकनाशकांची फवारणी करून फळधारणा टिकवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते.

केवळ बाजारात हंगामातील पहिला आंबा म्हणून नाव मिळवणे व्यावसायिकदृष्ट्या तोट्याचे ठरू शकते.

त्यामुळे बहुतांश बागायतदार या मोहोरावर फवारणी न करता त्याकडे दुर्लक्ष करत आहेत, तर काही जण त्यावर ताडपत्री ठेवून मोहोर जपण्याचा प्रयत्न करत आहेत.

पावसाळ्यात हापूस आंबा कलमांना मोहोर येणे हे हवामानातील अनियमिततेचे स्पष्ट उदाहरण असून याचा थेट लाभ बागायतदारांना होत नाही, असे मत वाटद-खंडाळा येथील आंबा बागायतदार उमेश रहाटे यांनी व्यक्त केले आहे.

मोहोर मोठ्या प्रमाणात असेल आणि त्याला पुन्हा पालवी आल्यास भविष्यातील उत्पादन विलंबाने येईल, अशी शक्यताही रहाटे यांनी वर्तवली आहे.