रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ६ मध्ये एनसीएमसी (NCMC) कार्ड नोंदणीच्या विशेष शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक, सुलभ व सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे रविवारी पार पडलेल्या या शिबिरात तब्बल १८५ नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून नोंदणी केली. नगरसेविका मेधा अविनाश कुळकर्णी आणि नगरसेवक राजीव यशवंत कीर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात ६० मुली, ८० महिला आणि ४५ पुरुषांनी आपला सहभाग नोंदवला.

नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत या विशेष शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विभाग प्रमुख मनोज साळवी आणि उपविभाग प्रमुख नरेंद्र देसाई यांनी शिल्पा सुर्वे यांचे स्वागत केले. तसेच एनसीएमसी कार्ड समृद्धी सर्विसेसच्या प्रतिनिधींचेही स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी मेधा अविनाश कुळकर्णी यांनी नागरिकांना एनसीएमसी कार्डच्या कार्यपद्धती आणि फायद्यांबाबत सविस्तर माहिती दिली.

या स्मार्ट कार्डची वैधता पाच वर्षांची असून त्यासाठी दर महिन्याला ठराविक रकमेचे रिचार्ज करण्याची कोणतीही सक्ती नाही. नागरिक प्रवासाच्या गरजेनुसार या कार्डमध्ये शंभर रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत रक्कम भरू शकतात.

एसटी बसमध्ये प्रत्यक्ष प्रवास करतानाच तिकीटाचे पैसे यातून वजा होणार आहेत. एसटी बसचे कंडक्टर, बसस्थानक, गुगल पे किंवा समृद्धी सर्विसेससारख्या अधिकृत एजन्सींच्या माध्यमातून हे कार्ड सहज रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी हे कार्ड अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के मोफत प्रवास, ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना ५० टक्के सवलत आणि महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना ५० टक्के तिकीट सवलत मिळवण्यासाठी या कार्डचा मोठा फायदा होणार आहे.

शिबिरात नोंदणी केलेल्या सर्व नागरिकांना त्वरित नोंदणीची पावती देण्यात आली आहे. नोंदणी प्रक्रियेनंतर साधारण एका महिन्याने संबंधितांचे एनसीएमसी कार्ड रत्नागिरी एसटी बसस्थानकातील चौकशी खिडकीच्या बाजूला उपलब्ध होणार आहे. सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत नागरिकांना आपले कार्ड तेथून प्राप्त करता येईल.

आधारकार्ड आणि मोबाईल सोबत आणून नागरिकांनी स्वतः या प्रक्रियेत सहभाग घेतला. प्रभाग क्रमांक ६ मधील रहिवाशांना प्राधान्य देण्यासाठी पूर्वनोंदणी आणि टोकन व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे संपूर्ण नोंदणी प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि सुरळीतपणे पार पडली.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मनोज साळवी, नरेंद्र देसाई, प्रिया साळवी, हरिश चौघुले यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या सुयोग्य नियोजनाबद्दल उपस्थित नागरिकांनी मेधा कुळकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.