दापोली : प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर यांनी दापोली शिवसेना शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर दापोली शहरात नव्या शहरप्रमुखाच्या निवडीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
या रिक्त पदावर पक्ष नेतृत्व कोणाची वर्णी लावणार, याकडे सर्वसामान्य नागरिकांसह शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.
शहरप्रमुख पदाच्या शर्यतीत सध्या अनेक नावांची जोरदार चर्चा सुरू असून स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.
या शर्यतीत माजी नगराध्यक्ष राजेंद्र पेटकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. त्यांनी यापूर्वी शहराची संघटनात्मक धुरा सांभाळलेली असून, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा विचार करता पक्ष एका ज्येष्ठ आणि अनुभवी चेहऱ्याकडे ही जबाबदारी सोपवू शकतो, असा एक मतप्रवाह आहे.
दुसरीकडे, आमदार योगेश कदम यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सचिन जाधव यांचे नावही चर्चेत आहे. जाधव यांची नुकतीच जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. यापूर्वी नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी शहरात केलेले काम लक्षात घेता, त्यांच्यावर ही अतिरिक्त जबाबदारी दिली जाणार का, याबाबत उत्सुकता आहे.
उपशहरप्रमुख म्हणून कार्यरत असलेले मंदार केळकर यांच्या नावाचीही चर्चा सुरू असून पक्ष संघटना त्यांच्या निष्ठेवर विश्वास दाखवणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
युवकांमध्ये पकड असलेला तरुण आणि स्वच्छ चेहरा म्हणून स्वप्निल बाबू पारकर यांचे नावही पुढे येत आहे. शहर युवा अधिकारी म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका पाहता, जर पक्षाने तरुण नेतृत्वाला संधी देण्याचे ठरवले, तर पारकर यांचे पारडे जड ठरू शकते.
याशिवाय कोणाशीही वाद नसलेले, शांत आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून सुनील रिसबूड यांच्या नावालाही स्थानिक शिवसैनिकांमधून पसंती मिळताना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची ही चर्चा जोरदारपणे होत आहे.
अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून नदीम मुकादम यांच्या नावाचीही एका गटामधून चाचपणी सुरू आहे.
याचबरोबर, शिवसेना नेते रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नुकताच भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत दाखल झालेले संजय सावंत यांच्या नावाचीही शहरप्रमुख पदासाठी चर्चा सुरू आहे. पक्षप्रवेशानंतर सावंत यांच्याकडे शहराची महत्त्वाची जबाबदारी सोपवून पक्ष नेतृत्व त्यांच्यावर शिक्कामोर्तब करणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या तालुकाध्यक्षपदी सध्या महिला पदाधिकारी असल्याने, शिवसेनाही महिला नेतृत्वाला संधी देऊन एखादा धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. अद्याप कोणत्याही महिला पदाधिकाऱ्याचे नाव थेट समोर आले नसले तरी सरप्राईज चेहऱ्याची शक्यता कायम आहे.
सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये असाही एक तर्क लावला जात आहे की, पक्ष सुरुवातीला एका प्रभारी शहरप्रमुखाची नियुक्ती करेल आणि पुढील काळात पुन्हा प्रसाद रेळेकर यांच्याकडेच ही धुरा दिली जाऊ शकते.
दापोलीत नुकत्याच पार पडलेल्या शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीत शहरप्रमुख निवडीचे सर्व अधिकार आमदार आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना देण्यात आले आहेत.
शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा अंतिम निर्णय घेतला जाणार असून, पक्ष नेतृत्व अखेर कोणाच्या गळ्यात शहरप्रमुख पदाची माळ टाकणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

