– दिनेश केळुसकर, सिंधुदुर्ग
काही काही नव्या प्रतिमा खूप मागे घेऊन जातात. जुन्या प्रतिमा समोर आणतात.
यातली वरील पहिली प्रतिमा पाहा. आमचे माजी खासदार सुरेश प्रभू यांनी किती मायेने , आपुलकीने आणि किती मित्रत्वाच्या भावनेने आमचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या खांद्यावर हात ठेवलाय … आणि निलेश राणे किती अदबीने स्मित हास्य करतायत. आणि हे पाहून डावीकडे उभे असलेले काका कुडाळकर किती समाधानाने हसतायत … सिंधुदुर्गचे राजकारण जवळून पाहिलेल्यांना ही नवी प्रतिमा पाहून नक्कीच इतिहासात डोकावसं वाटलं तर नवल वाटणार नाही.
ही प्रतिमा आहे 16 ऑगस्ट 2026 ची . प्रभू साहेबांच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी ‘ या उपक्रमाच्या निलेश राणे यांच्या मतदारसंघातल्या शुभारंभप्रसंगीची. खुद्द निलेश राणे यांनीच आपल्या फेसबुक पेज वर ही प्रतिमा शेअर करत प्रभू साहेब म्हणजे देशाची एक संपत्ती असं म्हटलय…
या प्रतिमेने आम्हाला तब्बल 17 वर्षे मागे नेलं . त्यावेळी म्हणजे 2009च्या लोकसभा निवडणुकीत कॉन्ग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या निलेश राणे या एका 27 वर्षाच्या तरुणाने ( त्यावेळी जेन – झी वगैरेचं अवडंबर नव्हतं फार ) सेना – भाजपातून तब्बल 13 वर्षे खासदारकी केलेल्या सुरेश प्रभूंना 46 हजार 750 मतांनी पराभूत करुन रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची खासदारकी पटकावली होती. त्यानंतर सुरेश प्रभू यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं. अलीकडेच त्यांचं ध्येयधुंद हे पुस्तक प्रकाशीत झालय…

ही दुसरी प्रतिमा आहे ती अर्थातच निलेश राणे यांच्या पहिल्या वाहिल्या विजयाच्या जल्लोषाची. आणि तिसरी प्रतिमा आहे ती, पराभवानंतर प्रभू आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या त्यावेळच्या चिंतनाची. नक्की आठवत नाही पण त्यावेळी म्हणे शिवसेनेचेच राजापूरचे तडफदार आमदार राजन साळवी यांच्याच मतदारसंघात सुरेश प्रभू 600 पेक्षा अधिक मतांनी पिछाडीवर पडले होते. त्यावेळी प्रभूंचा पराभव का आणि कसा झाला याच्या खूप सुरस कथा आहेत.


