दापोली : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दापोली अर्बन बँक कॉलेजच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) गौरवशाली प्रवासावर आधारित एका विशेष माहितीपटाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.

भौतिकशास्त्र विभागातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी इस्रोच्या ऐतिहासिक कार्याचा सखोल अभ्यास करून या माहितीपटाची निर्मिती केली.

भारताच्या अंतराळ संशोधनातील प्रगती, शास्त्रज्ञांचे योगदान आणि विविध ऐतिहासिक मोहिमांची माहिती या माहितीपटातून प्रभावीपणे सादर करण्यात आली.

या माहितीपटात भारताचा पहिला उपग्रह आर्यभट, इनसॅट मालिका, चांद्रयान-१, चांद्रयान-२, चांद्रयान-३, मंगळयान तसेच सूर्य मोहिमेसाठीचे आदित्य-एल१ यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या मोहिमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

इस्रोच्या स्थापनेपासून ते चंद्र आणि सूर्याच्या अभ्यासापर्यंतच्या अंतराळ प्रवासाची माहिती विद्यार्थ्यांनी दृकश्राव्य माध्यमातून मांडली.

या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र विभागप्रमुख डी. डी. कुलकर्णी, सहाय्यक प्राध्यापक व्ही. आर. जोशी आणि ए. एस. महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.

त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना संशोधन, पटकथा, दृश्यसाहित्य संकलन आणि अंतिम सादरीकरणात मोलाची मदत झाली. विद्यार्थ्यांनी या माहितीपटाच्या तांत्रिक आणि सादरीकरणाच्या सर्व बाबींमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला, ज्यामुळे त्यांच्या संशोधनवृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन मिळाले.

विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी जिज्ञासा वाढवण्यासाठी हा माहितीपट इतर महाविद्यालयांमध्येही प्रदर्शित करण्याचा विभागाचा मानस आहे.

यासाठी इच्छुक महाविद्यालयांनी भौतिकशास्त्र विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या यशस्वी उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य जी. बी. साठे आणि संस्थेचे संचालक रविंद्र कालेकर यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.