दापोली : माणूस देहाने दूर गेला तरी त्याचे विचार, कार्य आणि मूल्ये समाजात सदैव जिवंत राहतात, याची प्रचिती देणारा भावपूर्ण सोहळा दिवंगत अरविंद अमृते यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त १५ ऑगस्ट रोजी शिंदे सभागृह, दापोली येथे संपन्न झाला.

अमृते सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिवंगत अरविंद अमृते यांच्या जीवनप्रवास, कार्य आणि विचारांवर आधारित विशेष पुस्तकाचे प्रकाशन विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

नैसर्गिक शेती, नर्सरी उद्योग, सामाजिक बांधिलकी आणि तत्त्वनिष्ठ जीवनशैली या क्षेत्रांत त्यांनी केलेल्या कार्याचा प्रेरणादायी प्रवास पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आशिष अमृते यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक करताना शैला अमृते यांनी अरविंद अमृते यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या स्मृती व विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हाच या पुस्तक निर्मितीचा मुख्य हेतू असल्याचे नमूद केले.

प्रमुख पाहुणे डॉ. संजय भावे यांनी अरविंद अमृते हे नर्सरी आणि नैसर्गिक शेती क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते, असे सांगत हे पुस्तक त्यांच्या कार्याचा जिवंत दस्तऐवज असल्याचे मत मांडले.

विशेष अतिथी संजय यादवराव यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत नैसर्गिक शेती व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदान पद्मश्री पुरस्काराच्या तोडीचे असल्याचे सांगितले.

दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कृपा घाग यांनी अमृते परिवाराचे दापोलीच्या सामाजिक व औद्योगिक जडणघडणीत मोठे योगदान असल्याचे सांगून त्यांचे विचार पुढे नेणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल असे नमूद केले.

दापोली पंचायत समितीचे सभापती उन्मेष राजे यांनी ग्रामीण विकास आणि नर्सरी उद्योजकतेतील त्यांच्या योगदानाचा गौरव केला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके आणि ओघवते सूत्रसंचालन ट्रस्टच्या सचिव गोमती अमृते यांनी केले.

या सोहळ्यास डॉ. अशोक निर्बाण, डॉ. प्रमोद सावंत, डॉ. किशोर देसाई, डॉ. तोरणे, डॉ. जयवंत जालगावकर, रविंद्र कालेकर, प्रशांत परांजपे, अजित सुर्वे, नगरसेविका साधना बोत्रे, रेखा जेगरकर, सरोज मेहता, अनिश पटवर्धन, मंगेश मोरे, मंगेश सैतवडेकर, जालगावचे सरपंच अक्षय फाटक, राहुल मंडलिक, लायन्स क्लब दापोलीचे अध्यक्ष गुरुप्रसाद बेर्डे, आशिष मेहता, श्रीराम माजलेकर, मनोहर जैन, महेश पटोलिया, अतुल मेहता, सुजय मेहता, निलेश हेदुकर, फजल रखांगे, कौशिक मेहता, अतुल गोंदकर, कुणाल मंडलिक, भूषण इस्वलकर, ऋषिकेश शेठ, मयुरेश शेठ, लक्ष्मण गुरव, अरुण पालटे, अशोक गुरव, महेश मुंडेकर, सदानंद आंबेकर, सुनंदन भावे, सुजित पवार, मिलिंद मोरे, संतोष कोळंबेकर, मंदार केळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ट्रस्टचे उपाध्यक्ष किशोर अमृते, खजिनदार आशिका चाचड, जितेश पारेख, नीलिमा अमृते आणि सचिन गोवले यांनी विशेष परिश्रम घेतले.