दापोली: पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि शहराला प्लॅस्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने दापोली नगरपंचायतीने शहरात प्लॅस्टिक कॅरी बॅगविरोधात धडक कारवाई केली आहे.

दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कृपा शशांक घाग आणि मुख्याधिकारी महेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आलेल्या या विशेष मोहिमेमुळे बेकायदेशीरपणे प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध दुकाने आणि आस्थापनांवर अचानक छापे टाकून सुमारे १५ ते २० किलो प्लॅस्टिक कॅरी बॅग्ज जप्त करण्यात आल्या. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांकडून तत्काळ १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

या कारवाईच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने सर्व नागरिक आणि व्यापाऱ्यांना दैनंदिन व्यवहारात प्लॅस्टिक कॅरी बॅगचा वापर पूर्णपणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

यापुढे कोणत्याही दुकानात किंवा व्यक्तीकडे प्लॅस्टिक कॅरी बॅगची विक्री अथवा वापर होताना आढळल्यास त्यांच्यावर अत्यंत कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सक्त इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

ही कारवाई यशस्वी करण्यासाठी नगरपंचायतीचे कर्मचारी रिलेश गुरव, शितल शेठ, अरुण मोहिते, सुनिल टांक, शशिकांत रहाटे, संदिप डिंगणकर, मंगेश जाधव, वैभव कुमटेकर, अनिकेत सिंनगारे आणि सुधीर जाधव यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.