मुंबई‌ : प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यात नुकत्याच झालेल्या भेटीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

ही भेट केवळ एक औपचारिक भेट असावी आणि त्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नाही, असे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

बिहार पोटनिवडणुकीतील विजयानंतर प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. या बैठकीत प्रशांत किशोर यांनी सुनिल तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले असल्याच्या आणि राष्ट्रवादीसोबत काम करायचे असल्यास प्रदेशाध्यक्षपदाबाबत निर्णय घ्यावा लागेल अशी अट ठेवल्याच्या चर्चा सूत्रांच्या हवाल्याने समोर आल्या होत्या.

यावर बोलताना सुनिल तटकरे यांनी आपण प्रत्यक्ष मैदानावर काम करणारे कार्यकर्ते असल्याचे सांगितले. शरद पवार आणि अजित पवार यांच्यासारख्या नेत्यांसोबत मैदानावर काम केले असून आयुष्यात कधीही कोणत्याही निवडणुकीचा सर्व्हे केला नाही, तसेच आपल्याला कोणत्याही रणनीतीकाराची किंवा सर्व्हेची अजिबात गरज नाही, असा थेट टोला त्यांनी लगावला.

आपण आठ वेळा संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला असून राज्याचा कानाकोपरा, गावांतील लोक आणि तरुणाईची मानसिकता आपल्याला उत्तम प्रकारे ठाऊक असल्याचे सांगत त्यांनी आपल्या अनुभवावर पूर्ण विश्वास व्यक्त केला.