मुंबई : नुकतेच बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा ३० वर्षांचा बालेकिल्ला ढासळून ऐतिहासिक विजय मिळवणारे आणि आमदार झालेले राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट अनेक राजकीय अडचणींचा सामना करत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्यात तब्बल ५ तास मॅरेथॉन बैठक चालली.

या प्रदीर्घ चर्चेत जय पवार हे देखील ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाले होते, तर प्रशांत किशोर यांच्या टीममधील दोन सदस्य प्रत्यक्ष उपस्थित होते. या बैठकीत प्रशांत किशोर यांनी पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी रणनीती आखताना काही मोलाचे सल्ले दिले आहेत.

विशेषतः प्रदेशाध्यक्ष पद हे पक्षाच्या बांधणीत अतिशय महत्त्वाचे असते, त्यामुळे त्याबाबत गांभीर्याने विचार करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. प्रशांत किशोर यांनी सध्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.

पक्षात काम करताना प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकर्ते यांच्यातील संवाद अत्यंत महत्त्वाचा असतो, यावर या बैठकीत भर देण्यात आला. आता प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानंतर सुनेत्रा पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत कोणता मोठा निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.