रत्नागिरी: कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट गुणवत्ता असून, राज्यातील शैक्षणिक निकालात कोकण विभाग नेहमीच अव्वल राहिला आहे. भविष्यात याच कोकणातून शास्त्रज्ञ, आयएएस आणि आयपीएस अधिकारी घडून देशाच्या विकासात मोलाचे योगदान देतील, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
शिवसेना व युवासेनेच्या वतीने रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या दहावी व बारावीतील ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते.

या सोहळ्यास नगराध्यक्ष, जिल्हा परिषद शिक्षण सभापती, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, बंडशेठ साळवी, नगरसेविका, तुषार साळवी यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालकांनी सकाळपासूनच नोंदणीसाठी रांगा लावल्या होत्या.
नाट्यगृहाची आसनक्षमता संपल्याने आयोजकांना अतिरिक्त खुर्च्यांची व्यवस्था करावी लागली. युवा सेनेचे अभी दुडये, अथांग कदम, रोहित मायनाक, सर्वेश शेलार, लोभस देसाई, केदार कीर, अभी पेजे, देव मोरे, पार्थ पावसकर, ओम साळवी, ऋत्विक भंडारी, दुर्वेश पांगम आणि शिवसेनेचे शहर सचिव प्रथमेश साळवी यांनी या शिस्तबद्ध नोंदणी प्रक्रियेचे व कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उदय सामंत म्हणाले की, विद्यार्थ्यांनी भविष्यात काय बनायचे आहे याचे ध्येय आजच निश्चित केले पाहिजे. कोकण विभाग सातत्याने अव्वल राहण्याचे श्रेय येथील विद्यार्थ्यांच्या मेहनतीला जाते.
मतदारसंघातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व इतर अडचणी सोडवण्यासाठी एक विशेष ॲप विकसित करण्यात येत असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांचा डेटा उपलब्ध राहील आणि प्रतिनिधी त्यांच्याशी संपर्क साधून अडचणी जाणून घेतील.

तसेच या ॲपद्वारे शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची माहितीही दिली जाईल. परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि विविध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना उपलब्ध असून, ही माहिती पोहोचविण्यासाठी आपण २४ तास उपलब्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा उल्लेख करत ते म्हणाले की, भविष्यात कोकणातील विद्यार्थी डॉ. कलाम यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करतील. केवळ राजकारण नव्हे, तर सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहोत.

बळीराजा हा देशाचा कणा असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती क्षेत्रातील संधींचा विचार करण्याचे आवाहनही केले. कोकणातून जेव्हा मोठ्या संख्येने आयएएस व आयपीएस अधिकारी घडतील, तेव्हाच माझ्या कार्याला खरी पोचपावती मिळेल असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपल्या कार्यक्रमात बदल करून हजारो विद्यार्थ्यांसोबत स्वतंत्र छायाचित्रे काढली.
या सोहळ्यात नीट परीक्षेत राज्यात एसटी प्रवर्गातून प्रथम आलेल्या रत्नागिरीच्या भावेश चव्हाण याचा उदय सामंत यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला व त्याला पुढील शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले.

या कार्यक्रमात ग्रामीण भागातील ४२ आणि शहरी भागातील १२ शाळांमधील विद्यार्थ्यांसह एकूण सहा कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

