रत्नागिरी‌ : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने कबड्डी महर्षी दिवंगत शंकरराव उर्फ बुवा साळवी यांच्या जन्मदिनानिमित्त २६ वा कबड्डी दिन सोहळा बुधवार, १५ जुलै २०२६ रोजी रत्नागिरीतील माळनाका येथील देसाई बँक्वेट हॉल, हॉटेल विवेक येथे साजरा केला जाणार आहे.

या सोहळ्याचे औचित्य साधून दुपारी ३ वाजता वन म्युझिक हाऊस, मुंबई निर्मित ‘गोष्ट वारीची’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून वारीचा नयनरम्य सोहळा अभंग, कीर्तन, गोंधळ, जागरण आणि बतावणीच्या स्वरूपात गायन, नृत्य तसेच वादनासह रत्नागिरीकरांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.

रोहित सरनोबत आणि आदित्य कावले यांची निर्मिती असलेला हा भव्य सांस्कृतिक सोहळा पाहण्यासाठी रत्नागिरीतील क्रीडा व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि रत्नागिरी तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.