रत्नागिरी : जिल्ह्यातील मंडणगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. लाटवण येथील रहिवासी असलेले नारायण महादेव बर्वे हे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता होते, ज्यांचा नरकंकाल आता तिडे बोरीचा माळ येथील जंगलात आढळून आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण बर्वे हे २ मे २०२६ रोजी दुपारच्या सुमारास बेपत्ता झाले होते. याप्रकरणी त्यांचे पुत्र अविनाश नारायण बर्वे यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, ज्यावरून पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद करून तपास सुरू केला होता.

पोलीस हवालदार मांडवकर या प्रकरणाचा शोध घेत असतानाच, १३ जुलै २०२६ रोजी दुपारी तिडे गावचे पोलीस पाटील रवींद्र पवार यांनी खबर देणाऱ्यांना फोन करून बोरीचा माळ जंगलात एका शिवणीच्या झाडाजवळ मानवी कवटी आणि हाडे पडलेली असल्याची माहिती दिली.

तसेच तिथे एक हिरवट रंगाचा टी-शर्ट देखील पडल्याचे सांगितले. या माहितीनंतर अविनाश बर्वे आणि त्यांचा चुलत भाऊ प्रथमेश रामचंद्र बर्वे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

तिथे झाडाझुडपात मानवी बरगड्यांची हाडे, कवटी, चप्पल जोड, हिरवट रंगाचा टी-शर्ट, टोपी आणि काळ्या रंगाची हाफ पँट आढळून आली. इतकेच नव्हे तर, जवळच असलेल्या शिवणीच्या झाडाला वेढलेल्या वेलीच्या टोकाला गळफास लावल्याचा फासही दिसून आला.

घटनास्थळी सापडलेले कपडे आणि चप्पलवरून अविनाश बर्वे यांनी हे अवशेष त्यांच्या बेपत्ता वडिलांचेच असल्याचे ओळखले. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (बीएनएसएस) कलम १७४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.