संगमेश्वर : तालुक्यातील गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे चिपळूणच्या पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

५ जुलै रोजी करण्यात आलेल्या पर्जन्यमापन व पाणी पातळीच्या नोंदीनुसार, धरणाची एकूण पाणी पातळी १२२.२० मीटर इतकी झाली आहे.

सध्या गडनदी धरणात एकूण पाणीसाठा ६६.८५१३ दशलक्ष घनमीटर, तर उपयुक्त पाणीसाठा ६६.५३९३ दशलक्ष घनमीटर इतका आहे. ५ ते ६ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत धरण क्षेत्रात १०३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत धरण परिसरात एकूण ९९४ मि.मी. पाऊस पडला आहे.

हे धरण ६ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता पूर्णपणे भरून वाहू लागले. त्यावेळी धरणाची पाणी पातळी १२१.२० मीटर होती. सध्या सांडव्यावरील विसर्ग १२६५४२ क्युमेक्स असून विमोचकातून पाणी सोडलेले नाही.

सांडव्यावरून नदीपात्रात १.३१५ क्युसेक वेगाने पाणी वाहत असल्याने नदीपात्रात लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने नागरिकांना सुरक्षिततेच्या कडक सूचना दिल्या आहेत.

पावसाचा जोर कायम असल्याने गडनदी धरण पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांनी धरणाच्या पाण्यात उतरू नये तसेच सांडव्याच्या प्रवाहात शिरण्याचा धोका पत्करू नये, असे स्पष्ट आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तसेच, स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहून स्वतःसह आपल्या जनावरांची काळजी घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.