दापोली : येथील मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच यू. ए. दळवी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील दहावी, बारावी आणि इतर विविध परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष लियाकत रखांगे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक महेश तोरसकर आणि पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र यादव उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे भरभरून कौतुक केले. सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्तबद्धता आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर कोणतेही यश संपादन करता येते, असा कानमंत्र त्यांनी दिला.

यासोबतच आजच्या काळाची गरज ओळखून सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा आणि मित्रपरिवाराची योग्य निवड यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर पोलिसांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापकांनीही सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि या यशामागे पालक व शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सहकार्य किती मोलाचे आहे, हे आपल्या मनोगतातून अधोरेखित केले.
या सोहळ्याला संस्थेचे पदाधिकारी जावेद मणियार, नाझीम काझी, मुख्याध्यापक अय्युब मुल्ला, मुख्याध्यापिका नुजहत रखांगे, एम. ई. एस. वूमन डिग्री कॉलेजचे प्राचार्य शहाबाज देशमुख यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक जमीर जमादार यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षिका शबाना मुल्ला यांनी केले. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणारा हा संपूर्ण सोहळा अतिशय आनंददायी आणि सर्वांसाठी प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

