रत्नागिरी: समाजाप्रती असलेली आपली सामाजिक बांधिलकी जोपासत एकता रत्नागिरी जिल्हा टू-व्हीलर मेकॅनिक असोसिएशनच्या वतीने ‘संकल्प शैक्षणिक दातृत्वाचा २०२६’ हा स्तुत्य उपक्रम नुकताच राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत वायंगणी आणि मावळंगे क्रमांक २ येथील जिल्हा परिषद शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला बळ देण्याचे काम करण्यात आले आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर करणे, त्यांना आवश्यक ते सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या मनात शिक्षणाविषयी सकारात्मक प्रेरणा निर्माण करणे, हा या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमात असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स आणि इतर आवश्यक शालेय साहित्याचे संच भेट म्हणून देण्यात आले. यासोबतच मुलांना खाऊ आणि लस्सीचे वाटप करून आनंद द्विगुणित करण्यात आला.
मयुरेश भितळे यांनी विद्यार्थ्यांसाठी लस्सी उपलब्ध करून देत या आनंदात आपला खारीचा वाटा उचलला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच या उपक्रमाचा खरा गौरव असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष फैय्याज खतीब, कोकण विभाग अध्यक्ष मिलिंद पवार, सेक्रेटरी धनंजय कदम यांच्यासह मयुरेश यादव, समीर शेट्ये, दिलीप शिंदे, महेश पालकर, प्रमोद शिवलकर, गणपत वेदरे आणि जितेंद्र भूते आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान’ हा विचार प्रत्यक्षात आणत मेकॅनिक असोसिएशनने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले असून, भविष्यातही शिक्षण आणि समाजसेवेचे असे विविध उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार संघटनेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

