रत्नागिरी : जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एक महत्त्वाची घडामोड घडली असून युवासेना रत्नागिरी तालुकाप्रमुख तुषार साळवी यांची शिवसेना पक्षाच्या युवासेना दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख पदी अधिकृत निवड करण्यात आली आहे.
मुन्ना देसाई यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या या पदावर साळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
युवासेनेचे सचिव आणि कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या स्वाक्षरीने १० जून २०२६ रोजी हे नियुक्ती पत्र जारी करण्यात आले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर करण्यात आली.
युवासेनेचे नेते पूर्वेश सरनाईक आणि कोकण विभाग सचिव विकास गोगावले यांच्या सूचनेनुसार हे पत्र साळवी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचे खंदे समर्थक म्हणून तुषार साळवी ओळखले जातात. २०१४ पासून त्यांनी रत्नागिरी तालुक्याचे युवक प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
पक्षात फूट पडल्यानंतरही त्यांनी उदय सामंत यांची साथ न सोडता पक्षात आपले स्थान कायम राखले. सामंत यांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी आणि राजकीय काम तडीस नेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
गेल्या बारा वर्षांपासून रत्नागिरी तालुक्यामध्ये युवकांची मजबूत बांधणी करत साळवी यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले.
दरवर्षी महारक्तदान शिबीर आयोजित करून शासकीय रुग्णालयाला रक्त पुरवठा करणे, ग्रामीण भागात रक्तदान आणि आरोग्य शिबिरे घेणे तसेच शैक्षणिक क्षेत्रात युवकांच्या अडचणी उदय सामंत यांच्या माध्यमातून सोडवणे अशा कामांत त्यांनी सातत्य ठेवले आहे.
त्यांच्या याच दीर्घकालीन संघटन कौशल्याची आणि कार्याची दखल घेत नेतृत्वाने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि आनंद दिघे यांची शिकवण घेऊन आगामी काळात शिवसेना पक्ष वाढीसाठी साळवी सर्वांना सोबत घेऊन काम करतील, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.
या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना तुषार साळवी म्हणाले की,
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्याला या पदासाठी योग्य समजून ही मोठी जबाबदारी दिली आहे. वरिष्ठ नेतृत्वाने आणि सामंत यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी दक्षिण रत्नागिरीत संघटन वाढीसाठी आपण कायम प्रयत्नशील राहू.

