मुंबई: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे मच्छीमार जेट्टी उभारणीच्या प्रस्तावाला गती मिळत आहे. बुरोंडी परिसरातील मच्छीमारांच्या विविध समस्या, जेट्टी उभारणीची आवश्यकता आणि मत्स्य व्यवसायाच्या विकासासाठी शासन सकारात्मक असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली. बुरोंडी येथील मच्छीमार जेट्टीसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला सूर्यकांत दळवी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, केदार साठे, शिवानी गावकर यांच्यासह स्थानिक मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राणे म्हणाले की, रत्नागिरी हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा सागरी जिल्हा असून त्याला २३७ किलोमीटरचा किनारा लाभला आहे. मिरकरवाडा आणि हर्णे बंदराबरोबरच बुरोंडी हे मासळी उतरविण्याचे प्रमुख केंद्र मानले जाते.
सात ते आठ हजार लोकसंख्या असलेल्या बुरोंडी गावात नोंदणीकृत मच्छीमार सहकारी संस्था असून, या संस्थेशी २५०२ सभासद जोडले गेले आहेत. तसेच परिसरात सुमारे १०० नोंदणीकृत मासेमारी नौका कार्यरत आहेत.
मच्छीमारांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि मत्स्य व्यवसाय अधिक सक्षम करणे हे राज्य शासनाचे प्राधान्य असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
बुरोंडी येथे जेट्टी उभारल्यास वाहतूक खर्च कमी होऊन मासळीचा दर्जा टिकून राहील आणि स्थानिक मच्छीमारांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत होईल. जेट्टीमुळे मासळी थेट उतरविणे शक्य होणार असून डिझेल, पाणी आणि इतर साहित्य सहज उपलब्ध होईल.
तसेच वादळी हवामानात नौकांना सुरक्षित आश्रय मिळेल आणि पर्यटनासह व्यापारी हालचालींना चालना मिळून स्थानिकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सध्या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत हर्णे मत्स्य बंदर विकासाचे काम सुरू असून, त्याच धर्तीवर बुरोंडी येथेही आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
या जेट्टी प्रकल्पामुळे दापोली तालुक्यातील मत्स्य व्यवसायाला मोठी चालना मिळणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

