दापोली प्रतिनिधी : दापोली तालुका विधी सेवा समितीच्या वतीने येथील रामराजे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कायदेशीर मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमात बाल हक्क, बालकांचे संरक्षण आणि नागरिकांची मूलभूत कर्तव्ये या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना वकील प्रणित रहाटे यांनी बालकामगार, बाल तस्करी आणि बाल भिक्षावृत्ती या सामाजिक समस्यांविरोधात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
त्यांनी बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियमातील तरतुदी स्पष्ट करताना १४ वर्षांखालील मुलांना कामावर ठेवणे हा गुन्हा असल्याचे नमूद केले.
तसेच १४ ते १८ वयोगटातील मुलांना धोकादायक उद्योगांमध्ये काम करण्यास मनाई असल्याचे स्पष्ट केले.
बाल तस्करी रोखण्यासाठी भारतीय संविधानातील कलम २३ आणि भारतीय दंड संहितेतील कलमांतर्गत असलेल्या कठोर शिक्षेच्या तरतुदींची माहिती त्यांनी दिली.
बाल न्याय कायद्यानुसार मुलांना भीक मागण्यास लावणे हा गंभीर गुन्हा असून, संकटात सापडलेल्या मुलांसाठी १०९८ या ‘चाइल्ड हेल्पलाईन’ सेवेचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
वकील सुरभी सुर्वे यांनी भारतीय संविधानातील अनुच्छेद ५१(अ) अंतर्गत नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्यांविषयी माहिती दिली.
१९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्तीने संविधानात समाविष्ट केलेल्या कर्तव्यांचे पालन करणे हे अधिकारांइतकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा सन्मान, देशाची एकता, पर्यावरणाचे संरक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सार्वजनिक संपत्तीचे रक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
दैनंदिन जीवनात वाहतुकीचे नियम पाळणे आणि स्वच्छता राखणे यातूनही देशाच्या प्रगतीत योगदान देता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.
विधी सहाय्यक मनोज पवार यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या अधिकारांसोबतच दुसऱ्यांच्या अधिकारांचा सन्मान करण्याचे आवाहन केले.
या शिबिराला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाला शर्मिला सोमण, प्रणित रहाटे, सुरभी सुर्वे, मनोज पवार, आदिती भिडे, ओमकार कांबळे आणि पूजा कालेकर उपस्थित होते.

