मंडणगड : दापोली-बोरिवली मार्गावर धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या ईव्ही शिवाई बस आणि एका खाजगी कारचा केळवत गावाजवळ भीषण अपघात झाला.
मंगळवारी सकाळी ७.५० वाजण्याच्या सुमारास मंडणगडपासून ५ किमी अंतरावर असलेल्या घाटात ही घटना घडली. सुदैवाने, या अपघातात बसमधील २४ प्रवाशांपैकी कोणीही जखमी झाले नाही.
दापोली आगाराची ईव्ही शिवाई बस (MH-49-BZ-89942) सकाळी ६ वाजता बोरिवलीसाठी रवाना झाली होती. ही बस केळवत गावाच्या पुढे घाटातील वळणावरून जात असताना समोरून येणाऱ्या खाजगी कारने (MH-08-BE-6509) बसला धडक दिली.
कारची पुढची उजवी बाजू बसच्या उजव्या टायरच्या मागील पॅनलला घासल्याने दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.

या अपघातात शिवाई बसच्या साईड पॅनलचे सुमारे ५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, खाजगी कारचा बंपर आणि टायरजवळील भाग पूर्णपणे निकामी झाल्याने साधारण १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
अपघाताच्या वेळी बसचे चालक प्रफुल्ल यशवंत रेगाळे आणि वाहक प्रकाश मारुती सुकटे कर्तव्यावर होते. तर खाजगी कार मंडणगड येथील स्वानंद जाधव चालवत होते.
प्रत्यक्षदर्शी आणि प्राथमिक तपासानुसार, घाटातील वळणावर दोन्ही वाहने एकमेकांसमोर आल्याने हा अपघात झाला असून, या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.


