रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या वतीने रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी गठीत करण्यात आलेल्या ॲन्टी रॅगिंग कमिटीवर ‘संपर्क युनिक फाउंडेशन’ या एनजीओचे अध्यक्ष शकील गवाणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीचे अधिकृत पत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिले आहे.
सध्याच्या काळात महाविद्यालयांमध्ये रॅगिंगच्या वाढत्या घटनांमुळे अनेक विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते.
अशा प्रकरणांना पायबंद घालणे, विद्यार्थ्यांचे योग्य समुपदेशन करणे आणि रॅगिंग रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आखणे या उद्देशाने ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या या निर्णयाचे पालकांकडून स्वागत होत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ही समिती काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
या महत्त्वपूर्ण समितीवर निवड झाल्याबद्दल संपर्क युनिक फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य तसेच आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटना आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून शकील गवाणकर यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

