दापोली : मांदिवली गावातील उर्दू शाळेजवळून बॉक्साइटची वाहतूक करणारा डंपर आज दुपारी अचानक उलटल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी शाळेतील विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
विशेष म्हणजे, या वाहतुकीमुळे होणाऱ्या धुळीच्या त्रासाबाबत मानवाधिकार आयोगाकडे प्रकरण प्रलंबित असतानाच ही घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोवले आणि उंबरशेत येथून दररोज सुमारे १५० ते २०० डंपर मांदिवली गावातून ये-जा करतात. मांदिवलीकडे जाणारा रस्ता अत्यंत अरुंद असून गावात शिरताना तो अधिकच निमुळता होतो.
अशा अरुंद रस्त्यावरून ओव्हरलोड डंपर भरधाव वेगाने चालवले जात असल्याचे स्थानिक सांगतात. आजच्या घटनेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अनेक डंपरला नंबर प्लेटही नसतात, तरीही प्रशासनाकडून या बेकायदा वाहतुकीवर कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही.
मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही.
शाळेजवळ झालेला हा अपघात प्रशासनाच्या दुर्लक्षाचा पुरावा असून, ही वाहतूक तातडीने न थांबवल्यास भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या घटनेनंतर आता प्रशासकीय पातळीवर काय पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

