
दापोली: नारी शक्तीला बळ देणाऱ्या महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा दापोली तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे.
शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीने संयुक्तपणे हा निषेध व्यक्त करण्यात आला.
केंद्र सरकारने मांडलेल्या महिला आरक्षण विधेयकामुळे देशातील महिलांना राजकारणात आणि समाजकारणात हक्काचे स्थान मिळणार आहे.
मात्र, या ऐतिहासिक निर्णयाला आणि नारी शक्तीच्या प्रगतीला काही घटक जाणीवपूर्वक विरोध करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
हा विरोध म्हणजे महिलांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न असून, दापोली शिवसेनेने अशा विचारसरणीचा धिक्कार केला आहे.
नारी शक्तीचा सन्मान करणे हे शिवसेनेचे कर्तव्य असून, महिलांच्या सक्षमीकरणासाठी येणाऱ्या प्रत्येक विधेयकाच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा आहे.
या आंदोलनाद्वारे महिला विरोधी मानसिकतेचा निषेध करत, कोणत्याही परिस्थितीत महिलांचे आरक्षण आणि त्यांचे हक्क अबाधित राखण्यासाठी शिवसेना संघर्ष करेल, असा पवित्रा दापोलीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
यावेळी रोहिणी सु. दळवी (उप जिल्हा संघटिका), दिप्ती दि. निखार्गे (महिला तालुका संघटिका) आणि रसिका रा. पेटकर (शहरप्रमुख), दापोली नगरपंचायत नगराध्यक्ष कृपा घाग, माजी समाज कल्याण सभापती चारुता चं. कामतेकर, उपसभापती नम्रता तोडणकर, नगरसेविका प्रिती शिर्के, अश्विनी लांजेकर, नौशिन गिलगिले, माजी तालुका संघटिका उल्का जाधव, महिला युवती तालुका अध्यक्षा ऐश्वर्या कामतेकर, जिल्हा परिषद सदस्या साधना महाजन, वैशाली धाडवे, पंचायत समिती सदस्या सुवर्णा खळे, अंकिता घुबडे, सुचिता महाडिक, माजी जिल्हा परिषद सदस्य रेश्मा झगडे आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply